
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रज्ञाताई सातव यांची लक्षवेधी कामगिरी
नुकतेच राज्यशासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करीत सभागृहात आपल्या लक्षवेधी कामगिरीचा ठसा उमटविला.
दिवंगत खा.राजीवजी सातव यांनी राज्याच्या सभागृहात तसेच केंद्रामध्ये देखील संसदेत आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.त्यांच्या आकस्मित जाण्यानंतर काँग्रेस पक्षाने आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली या संधीचे सोने करीत आ.प्रज्ञाताई सातव यांनी सभागृहात लक्षवेधी कामगिरी बजावली आहे.पक्षाने दिलेली संधी ही जनतेच्या सेवेकरिता आहे याचे भान ठेवून आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडली. हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यामुळे अनेक संसार देशोधडीला लागले आहेत.याकडे सरकारचे लक्ष वेधताना याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचे सर्वपक्षीय आमदारांनी बाके वाजून समर्थन देखील केले.
कोरोना काळात अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या अशा वर्कर आणि गटप्रवर्तकच्या समस्यादेखील त्यांनी आपल्या प्रश्नातून मांडल्या. औंढा येथील धान्य घोटाळा, कळमनुरी नगर परिषदेतील प्रश्न, याचबरोबर पिक विमा, आरोग्य, रोजगार हमी योजना,शिक्षण विभागातील समस्या आणि शेतकरी,शेतमजूर महिला, बेरोजगार युवक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नां संदर्भात सरकारचे लक्ष वेधले.विधिमंडळ कामकाजाच्या दृष्टिकोनातून नवख्या असणाऱ्या आ.प्रज्ञाताई सातव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध विषयांवर जोरदारपणे मांडलेली भूमिका ही कौतुकाचा विषय ठरली आहे.
