महाराष्ट्र

मोदी सरकारच्या योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवा ; पंकजाताई मुंडे यांचं आवाहन

मोदी सरकारच्या योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवा :- पंकजाताई मुंडे यांचं आवाहन

● भोपाळमध्ये उत्साहात पार पडली मध्यप्रदेश भाजपची बैठक

● मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेसह वरिष्ठ नेते उपस्थित

भोपाळ दि.०१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत, या योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक भोपाळ येथे उत्साहात संपन्न झाली, त्यावेळी उपस्थित भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश प्रभारी मुरलीधर राव, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, राष्ट्रीय सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचेसह अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

भाजपचा स्थापना दिवस ६ एप्रिल ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल या दरम्यान गरीबांच्या वस्तीत जा आणि त्यांचेपर्यंत मोदी सरकार आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने ज्या कल्याणकरी योजना आखल्या आहेत, त्याचा लाभ मिळवून द्या. मोदी सरकार हे गरीबांचे हित जोपासणारे सरकार आहे, त्यांनी गरीबी जवळून पाहिली असल्याने त्यांना या घटकांविषयी विशेष आस्था आहे असे पंकजाताई म्हणाल्या.

● प्रोत्साहनाने भारावले

नेहमी प्रमाणे प्रदेश बैठकीत भाषणानंतर लोकांचे प्रोत्साहन मिळाले. सर्वांनी उत्साहात केलेलं स्वागत स्विकारलं. मला इथून नेहमीच काहीतरी शिकायला मिळतं , सर्वांच्या प्रोत्साहनाने भारावून गेले असं ट्विट पंकजाताई मुंडे यांनी बैठकीनंतर केलं.

या बैठकीत बुथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम वेळोवेळी पार पाडून यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धुर्वे, सुहास भगत, प्रदेश सरचिटणीस भगवानदास सबनानी, कविता पाटीदार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

To Top