महाराष्ट्र

पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – ना. अजितदादा पवार

पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – ना. अजितदादा पवार

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन यावेळी अजितदादांनी केले. यावेळी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमांसाठी ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत जुलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल, असा शब्द अजितदादांनी गृहमंत्र्यांना दिला. पोलीसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही, तसेच पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी –
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.
यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.

 

To Top