महाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर केला : माजी आमदार विद्या चव्हाण

चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर केला

माजी आमदार विद्या चव्हाण, डॉ. आशाताई मिरगे, आरती साळवी, स्वाती माने यांचा पत्रकार परिषदेत आरोप

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ महिला अत्याचार पीडितांचा वापर करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कुठल्याही पक्षातील महिला नेत्यांनी राजकीय स्वार्थापोटी महिला अत्याचार प्रकरणाचे भांडवल करू नये, तसेच भाजपमधील काही महिला नेत्यांना स्त्री म्हणणे म्हणजे संबंध स्त्री वर्गाचा अवमान आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार विद्या चव्हाण यांनी आज केली. यावेळी राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या व प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशाताई मिरगे, सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त सदस्या आरती साळवी आणि राष्ट्रवादी मुंबई सचिव स्वाती माने यांनी देखील चित्रा वाघ यांच्या कार्यपद्धतीबाबत जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण उपस्थित होते.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर सदस्य म्हणून काम करत असताना ज्या प्रकरणातील आरोपी पद, पैसा आणि प्रतिष्ठेने मोठा आहे, अशाच प्रकरणात लक्ष घातले होते, अशी माहिती डॉ. आशाताई मिरगे यांनी दिली. चित्रा वाघ या सुरुवातीपासून ज्या प्रकरणात काहीतरी फायदा होईल, अशाच महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालायच्या, तसेच गरीब महिलांच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करायच्या. माजी मंत्री संजय राठोड आणि रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांची हीच मोडस ऑपरंडी पुन्हा दिसून आली. दोन्ही प्रकरणात समोरची व्यक्ती राजकीयदृष्ट्या मोठी असल्यामुळेच चित्रा वाघ यांनी राजकीयदृष्ट्या त्यात लक्ष घातले, असा आरोप डॉ. मिरगे यांनी केला.

राठोड आणि कुचिक प्रकरणात आकांडतांडव करणाऱ्या चित्रा वाघ या भाजपमधील प्रकरणात सोयीस्कररीत्या मौन बाळगतात, असाही आरोप डॉ. मिरगे यांनी केला. भाजपचा कल्याण अध्यक्ष संदीप माळी याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चित्रा वाघ यांच्याशी संपर्क साधला होता, तरीही चित्रा वाघ यांनी यावर तोंड उघडलेले नाही. तसेच भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर देखील एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत, त्याही प्रकरणी चित्रा वाघ या मूग गिळून गप्प का आहेत? असा सवालही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.

तसेच यावेळी चित्रा वाघ यांच्या एकेकाळच्या सहकारी स्वाती माने यांनी चित्रा वाघ यांच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. पुण्यातील तथाकथित पीडित मुलगी जेव्हा गोव्यात आढळली आणि तिने तिथून चित्रा वाघ यांना फोन केल्याची बातमी जेव्हा टीव्हीवर दाखविण्यात आली तेव्हाच हे प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचा संशय मला आला होता, अशी माहिती स्वाती माने यांनी दिली. चित्रा वाघ या कधीच स्वतःचा मोबाईल नंबर कुणाला देत नाहीत. राष्ट्रवादीत असताना देखील त्या माझाच मोबाईल नंबर कार्यकर्त्यांना द्यायच्या. मग या मुलीकडे त्यांचा नंबर कसा आला? तसेच ही मुलगी पुण्याची होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या पुण्यातीलच आहेत, मग त्यांच्याशी मुलीने संपर्क का साधला नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत होते. चित्रा वाघ यांना स्वतःला मुलगी नाही, याचा अर्थ त्यांनी दुसऱ्यांच्या मुलींचा गैरफायदा उचलायचा असा होत नाही, अशी जोरदार टीका स्वाती माने यांनी केली.

कुचिक प्रकरणात ज्या मुलीला पीडित म्हणून दाखविले जात होते, ती मीडियासमोर आल्यामुळे चित्रा वाघ यांचे बिंग फुटले आहे. पुढे पुढे या प्रकरणात आणखी काय सेटलमेंट झाली ते देखील बाहेर येईल, असे सुतोवाच माजी आ. विद्याताई चव्हाण यांनी केले. तसेच महिला अत्याचार प्रकरणांचा वापर जे पुढारी राजकीय स्वार्थासाठी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

To Top